भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ आर्यभटीय - शब्दार्थ, श्लोकार्थ, स्पष्टीकरण ---- लेखक मोहन आपटे
अरविंद परांजपे, आयुका, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे ४११००७
भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ आर्यभटीय - शब्दार्थ, श्लोकार्थ, स्पष्टीकरण हे पुस्तक लिहीताना प्राध्या,. मोहन आपटेयानी ओखमाच्या वस्त-याचा (Occam's razor) भरपूर आणि मनःपूर्वक उपयोग केलेला दिसतो. थोडक्यात आपल्या प्रबंधाला सोपा आणि सुटसुटीत ठेवण्या करता ज्याची गरज नाही असा भाग त्यानी (ओखमाझ रेझरने) छाटून टाकला आहे. त्या मुळे खरतर या पुस्तका बद्दल काही लिहायचे तर सरळ सरळ पुस्तकातील उतारेच द्यावे लागतील. (ओखमाचा विल्यम या १४ व्या शतकातील तर्कशास्त्री हा विचार मांडला होता की गरज नसताना त्याच त्यात बाबी लिहू नये)
आधीच गागर मे सागर असा हा मूळ आर्यभटीय ग्रंथ आणि त्याला संपूर्ण संमान देत आपटे यानी थोडक्यात या ग्रंथाचा सार आपल्या समोर ठेवला आहे. फक्त सुमारे अडीचशे पानाचे पुस्तक प्रकाशित करण हे कदाचित राजहंसच धाडसच म्हणाव लागेल कारण बहूसंख्य वाचक कदाचित पुस्तक उघडल्यावर त्यातील गणित आणि रेखा चित्र बघितल्यावर हे माझ्या आवक्या पलिकडचे आहे असे समजून ते खाली ठेवण्याची शक्यता आहे. पण ज्यांच भारतीय विज्ञानावर आणि खगोलशास्त्रावर प्रेम आहे त्यांचासाठी हे पुस्तक म्हणजे माजगावकर आणि आपटे यांची एक बहूमुल्य देणगी म्हणावी लागेल. कदाचित काही गणित अवघड वाटतील सुद्धा पण एकंदरीत ज्या कौशल्याने श्लोकांचे अर्थ दिले आहेत त्या मुळे ही गणिते आपल्याला कळायला सोपी झाली आहेत.
प्राध्यापक आपटे यांच्या लिखाणाचे आणि त्यातून हे आर्यभटीय चे शब्दार्थ, श्लोकार्थ, स्पष्टीकरण अशा पुस्तकाचे परिक्षण करावे ही माझी खरतर पात्रता नाही. पण जेव्हा पुस्तक माझ्या हातात पडले तेव्हा हे बाजारत येऊन अवघे दोन दिवस सुद्धा झाले नव्हते. ठाण्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी आपटे यांनी हे पुस्तक आयुकाचे संचालक प्रा. अजीत केंभावी यांना दिले होते आणि ठाणे ते पुणे या प्रवासात मला हे पुस्तक बघायला वेळ मिळाले होते. आणि जेव्हा या पुस्तकाचे परिक्षण करण्याची संधी मला मिळाली तेव्हा मला कळलेला, मला आकलन झालेला भाग समोर ठेवत आहे. यातील जो भाग मला चुकीचा वाटला तो मलाच कळला नसावा ही माझी प्रामाणिक समजूत आहे.
खगोलशास्त्रावर प्रेम करणारा आणि त्यातून तो भारतीय असेल तर त्याला आर्यभाटाबद्दल माहीत नसेल अशी शक्यता कमीच पण खोलात जाऊन आर्यभाटाचे नेमक योगदान काय याची मात्र फार कल्पना नसते आणि माझ पण नेमक तेच झाल होत. पण या पुस्तकाच्या माध्यमातून मला आर्यभटाच्या कार्याला समजवून घेण्याची संधी मिळाली आहे.
या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे या पुस्तकाचा, आर्यभटाचा आणि आर्यभटाच्या कार्याचा परिचय जो १३ व्या पानावर संपतो. पुढे २४५ पानांपर्यंत लेखाने आर्यभटीयायील ५० श्लोकांचा शब्दार्थ, श्लोकार्थ आणि स्पष्टीकरण आपल्या समोर ठेवले आहे. आणि शेवटच्या ६ पानात ५ परिशिष्टांच्या माध्यमातून त्यानी आर्यभाटीयातील गणितची पाश्चात्य आणि आधुनिक गणिताशी तुलना दिली आहे.
ज्याना आपल्या (भारतीय) संस्कृतीचा, आपल्या कडे झालेल्या शोधका-याचा अभिमान आहे त्यानी विशेषतः अशा लोकांनी ज्याना वाटतं की विश्वातील सर्व ज्ञान आपल्याच कडे होतं त्यानी तर हे पुस्तकातील पहिला भाग आवष्य वाचावा. या पहिल्या भागात लेखाने अवघ्या १३ पानात भारतीय विज्ञानाच्या प्रगतीचा इतिहास दिला आहे. या संदर्भात लेखकाच्या भाषेतच सांगायचे झाले तर " प्राचीन काळी आपल्याकडे यंव ज्ञान होते, त्यंव तंत्रज्ञान उपलब्ध होते अशा गप्पा मारण्यात आपण प्रवीण आहोत. ब-याच वेळा मूळ ग्रंथाचे परिशीलन न करतातच आपण बाता माहीत असतो" . तर ज्याचा कल आपल्याकडे असलेलं सर्व ज्ञान पश्चिमेतून आल आहे त्यांचे डोळे या पुस्तकाचा दुसरा भाग वाचून पूर्ण उघडलीत. या भागात त्यानी आर्यभटीयातील दशगीतिका तील १३, गणितपाद मधील ३३, कालक्रियापाद मधील २५, गोलपाद ५० अशा १२१ मूळ श्लोकांचा शब्दार्थ, श्लोकार्थ आणि स्पष्टीकरण दिले आहेत.
पुस्तकाची सुरवातीलाच आर्यभट्ट का आर्यभट या वादाच्या संदर्भात लेखक स्पष्टपणे सांगतो की आर्यभटीय या ग्रंथाचा कर्ता आर्यभट आहे. आणि मग त्यानी आर्यभटाचा काळ, निवासस्थान, त्याच शिक्षण, त्याच्या ग्रंथाबद्दल कोणी (भारतीय आणि पाश्चात्य) काय भाष्य केलं आहे हे थोडक्यात पण स्पष्ट सांगीतलं आहे. तसेच इ.स. ४९९ साली लिहीलेला आर्यभटाने अवघ्या २३व्या वर्षी लिहीलेल्या आर्यभटीय या ग्रंथा पूर्वी कुठला ही ग्रंथ उपलब्ध नाही आणि म्हणून आर्यभटीय हा ग्रंथ महत्वाचा ठरतो. तसेच या ग्रंथा मध्ये श्लोकांच्या माध्यमातून त्याने जी सूत्रे मांडली किंवा नियम सांगीतले ते कसे आले किंवा त्यानी ही गणिते कशी सोडवली याची आपल्याला काहीच माहिती नाही. त्या बद्दलच लिखाण उपलब्ध नाही.
प्रा. आपटे यांच्या लिखाणाच एक पैलु म्हणजे आर्यभटीय मधील जी बाब अचुक आहे ती तर त्यानी सांगीतलीच आहे पण काही ठिकाणी आर्यभट चुकला ही आहे. त्याच स्पष्टीकरण पण आपटे यानी दिले आहे. आणि जेव्हा त्याना अढळून आले की या श्लोकात संपूर्ण स्पष्टता नाही तर ते ही त्यानी नमूद केलेले आहे. जिथे त्याना शंका वाटली ती त्यानी स्पष्ट सांगीतली आहे. या श्लोकांबद्दल लिहीण्याचा मोह आवरता घेत फक्त दोन श्लोकांबद्दल सांगावेसे वाटते.
गोलपाद मधील ४७ वा श्लोकाच स्पष्टीकरण आपटेयानी दिल आहे की खग्रास सूर्यग्रहण काळात चंद्रबिंब सूर्याला झाकते परंतू सूर्यबिंबाचा सात अष्टमांश भाग झाकला गेला तरी सूर्यग्रहण लागल्याची जाणीव होत नाही. हे सत्य मी स्वतः ४ वेळा अनुभवल आहे.
आर्यभाटाच्या काळात ग्रहांच्या दीर्धवर्तुळाकृती भ्रमणाची कल्पना नव्हती. पृथ्वी हेच भगोलाचे केंद्र मानण्यात ये होते. पण ज्या मार्गाने ग्रह पृथ्वी भोवती भ्रमण करताना भासतात त्यांची केंद्र पृथ्वीकेंद्राशी जुळत नाहीत हे सत्य कालक्रियापाद मधील २१ श्लोकात आर्यभटाने नमुद केलं आहे.
प्रा. मोहन आपटे प्रांजळ पणे कबूल करतात की त्यांच संस्कृत भाषेच ज्ञान जुजबी आहे आणि त्यानी मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. उमा वैद्य याची मदत घेतली. आपले कर्तव्य म्हणून त्यानी इशारा दिला आहे की वाचकांना आपल्या मेंदूला ब-यापैकी ताण द्यावा लागेल. पण तो ताण छान व्यायाम करून दमल्यावर जी आनंद देणारी अनुभुती होते तसा आहे.
No comments:
Post a Comment