सुमारे १७२४ ते १७३० या काळत जयपूरचे राजे सवाई जयसिंग (द्वितीय) यांनी दिल्ली, जयपूर, वाराणसी, मथुरा आणि उजैन अशा पाच ठिकाणी जंतर-मंतर या खगोलीय वेधशाळा उभारल्या ख-या पण त्यातील कुठल्याही यंत्रात भिंग असलेल्या दुर्बिणी मात्र नव्हत्या. ही एक आश्चर्याची बाब आहे. कारण खगोलनिरीक्षणासाठी दुर्बिणीच्या वापराला सुरवात होउन १०० वर्षापेक्षा जास्त काळ लोटला होता. दुसरं असं की जयसिंग यांनी सुरू केलेल्या खगोलनिरीक्षणाचा वारसाही कोणी उचलला नाही. असं सांगतात की, जयसिंग यांच्या नातवाने जयपूर येथील जंतर-मंतरच्या परिसराचा उपयोग दारूगोळा बनवण्याच्या कारखान्यासाठी केला आणि एका ४०० किलोच्या यंत्राचा नेमबाजी करण्यासाठी वापर केला.
आधुनिक दुर्बिणी वापरून खगोलनिरीक्षणाची प्रथा भारतात युरोपियन लोकांबरोबर आली. खरतर त्यानी दुर्बिणींचा वापर सर्वेक्षणासाठी केला होता. पहिले मोठे खगोलनिरीक्षण म्हणजे १७६१ आणि १७६९ साली झालेले शुक्र-सूर्य यांचे पिधान म्हणावे लागेल. या पिधानांची निरीक्षणे घेण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात वेध घेण्याची उपकरणे भारतात आणली.
भारतात पहिली वेधशाळा नेन्नेइत एगमूर या ठिकाणी विल्यम पेट्री यांनी १७६८ साली बांधली. ही त्यांची खासगी वेधशाळा होती. पुढे दोन वर्षांनंतर ती नुंगमबाकम (चेन्नेइतच) येथे हलवण्यात आली. आजही तिथे त्या काळीतील पुरावे शिल्लक आहेत. या वेधशाळेतील थॉमस टेलर यांनी १३ वर्षांच्या निरीणानंतर १८४३ साली अकरा हजार ता-यांची यादी प्रकाशित केली. त्यांच्या या कामाची खूप प्रशंसाही झाली.
पुढे एका मागून एक अशा वेधशाळा उभारण्यात येऊ लागल्या. पण आपण वळूया एका महत्त्वाच्या वेधशाळेकडे. सन १८८८ साली त्या काळतील सर्वात मोठी दुर्बिण पुण्यातील इजिनियरिंग कॉलेजमध्ये बसवण्यात आली. या दुर्बिणीच्या आरशाचा व्यास २० इंच होता (खरतर आहे). सुमारे ८० वर्षे भारतातील ही सर्वात मोठी दुर्बिण होती. या दुर्बिणीला भारतात आणण्याचं श्रेय केशवजी दादाभाई नगरवाला यांच आहे. ते एलफिन्स्टन कॉलेज, मुंबईचे विद्यार्थी होते व १८७८ ते भौतिक आणि रसायनशास्त्रात प्रथम वर्गात एम. ए. झाले होते. त्यांना मुंबईच्या कुलपतींच सुवर्ण पदक देण्यात आलं. नंतर ते १८८२ साली परत आपल्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रूजू झाले. त्याच वर्षी भावनगरचे महाराजा तक्तसिंगजी यांनी एलफिंन्स्टन कॉलेजला भेट दिली व प्रयोगशाळेसाठी पाच हजार रूपयांची देणगी पण दिली. त्यात मुंबई सरकारनी तेवढीच भर घातली. या देणगीचा वापर निगमवाला यांनी इंग्लंडहून २० इंच व्यासाची दुर्बिण आणण्यासाठी केला. पुण्याचे हवामान खगोलनिरीक्षणासाठी मुंबईपेक्षा जास्त चांगलं म्हणून ही दुर्बिण पुण्यात बसवण्यात आली. वेधशाळेला तक्तसिंगजी वेधशाळा नाव देण्यात आले.
नगरवाला यांच्या रिटायरमेंटबरोबरच पुण्यातली ही वेधशाळाही बंद पडली आणि या दुर्बिणीला (आता हिला भावनगर दुर्बिण म्हणून ओळखतात) बराच प्रवास झाला. चेन्नेई येथील वेधशाळेचे स्थालांतर कोडइकनालला करण्यात आले. भावनगर दुर्बिण तिथेच हलवण्यात आली. पुढे १९७१ साली कोडइकनाल वेधशाळेचे रूपांतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजक्स झाले. लद्दाखमध्ये जेव्हा मोठी दुर्बिण बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे ठरवले तेव्हा ही दुर्बिण लेहला पाठवण्यात आली होती. लेहमध्ये दोन वर्षे (१९८२ - १९८४ ) ही दुर्बिण वापरण्याची संधी मला मिळाली होती. या दुर्बिणीचे मुख्य भाग अजूनही कसेच आहेत सध्या ही दुर्बिण कावलूर वेधशाळेत आहे.
लोकसत्ता - जिज्ञासा, ३-१२-२००१
No comments:
Post a Comment